धाराशिव :
शिक्षकांच्या विविध प्रलंबित अडी-अडचणी व न्याय्य मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालय, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर व ठाम पाठिंबा दिला आहे.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील अनियमितता दूर करणे, पदोन्नती प्रक्रियेत आलेल्या आक्षेपांची सुनावणी घेणे, एकाच कॅम्पसमधील एकत्रित प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र ठेवणे, प्रलंबित निवडश्रेणीचे प्रश्न निकाली काढणे, रिक्त भाषा, माध्यमिक व विज्ञान विषयांच्या शिक्षक पदांवर पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्या शिक्षक संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.
तसेच कोरोना काळातील प्रलंबित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण करणे, 12 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देणे आणि कोरोना काळात शिक्षकांनी जमा केलेल्या निधीचा योग्य विनियोग करणे, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे.
शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या न्याय्य व रास्त मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
या संदर्भात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने उमेश राजेनिंबाळकर यांनी शिक्षकांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. यावेळी खलील सय्यद,धनंजय राऊत, सरफराज काझी उपस्थित होते.