शिंगोली आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन

Spread the love

शिंगोली आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन

शिंगोली : शिंगोली येथील आश्रमशाळेत भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुरेखा कांबळे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती बालिका बोयणे उपस्थित होत्या. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रत्नाकर पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित लोककल्याणकारी संविधानाची निर्मिती केल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात श्रीमती सुरेखा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संघर्षावर प्रकाश टाकला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,’ हा बाबासाहेबांचा विचार सांगत शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात परिवर्तन घडू शकते, असे त्यांनी नमूद केले. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षकांचे आणि वडिलांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्या श्रीमती बालिका बोयणे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही बाबासाहेबांनी शिक्षणाची वाट सोडली नाही, याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. आज विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असूनही शिक्षणासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी बाबासाहेबांचे विचार मांडताना विद्यार्थ्यांनी सत्तेचे वाटेकरी होण्याचे स्वप्न पाहावे, असे आवाहन केले. बाबासाहेबांनी अथक अभ्यास, वाचन आणि ज्ञानाच्या बळावर अनेक पदव्या प्राप्त केल्या. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी त्यांनी सुमारे तीन वर्षे परिश्रम घेतले. तसेच नदीजोड प्रकल्पासह शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी विविध योजना व संकल्पना मांडल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी, तहसीलदार, वकील, डॉक्टर, अभियंता, उद्योजक अशा विविध क्षेत्रांत उच्च पदे प्राप्त करावीत. स्वतःच्या गावापासून देशाच्या प्रगतीपर्यंत योगदान देत भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांचे विचार आणि संविधानिक मूल्ये महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी खंडू पडवळ, कैलास शानिमे, क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे, वरिष्ठ लिपिक संजयकुमार मस्के, प्रशांत राठोड, मल्लिनाथ कोणदे, इरफान शेख, विशाल राठोड, सचिन राठोड, सूर्यवंशी, ज्योती साने, ज्योती राठोड, गोविंद बनसोडे, वसंत भिसे, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, सागर सूर्यवंशी, अमोल जगताप यांच्यासह शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!