दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला लागावे; दिरंगाई खपवून घेणार नाही – आमदार कैलास पाटील

धाराशिव : तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा यावेळी आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला.
बैठकीत तालुक्यातील सर्व गावांमधील नळपाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, चारा लागवड, पाण्याचे पर्यायी स्रोत आणि रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना केवळ कागदोपत्री प्रस्ताव आणि आढाव्यांमध्ये वेळ न घालवता प्रत्यक्ष उपाययोजनांना सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ज्या गावांना नवीन पाइपलाइन, विहीर, बोअर किंवा अन्य पाण्याच्या स्रोतांची आवश्यकता आहे, अशा गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले. जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणे, गावठाणातील विहिरींचे खोलीकरण व दुरुस्ती, अंतर्गत पाइपलाइन दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जनावरांच्या चारा उपलब्धतेबाबतही आमदार पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. चारा लागवडीसाठी ग्रामपंचायतींकडून सादर केलेले प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढून प्रत्यक्ष कामे सुरू करावीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व जनावरांचे पुढील आठ दिवसांत १०० टक्के विनामूल्य टॅगिंग पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
शेती व पाणीपुरवठ्यासाठी कृषी वीजपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व एजी फिडरवर १०० टक्के एचडीटी बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची कामे तातडीने हाती घेऊन पाणीटंचाई निवारणासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये गरजेनुसार बोअर अधिग्रहणाची कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले.
टंचाई निवारणाच्या कामांमध्ये प्रशासकीय पदांवरील जबाबदारीमुळे अडथळे निर्माण होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासक पदावरून कार्यमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दुष्काळाचे संकट केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून शेतमजूर, पशुपालक, महिला आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणी, चारा आणि रोजगार या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. संकट आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच त्याचा मुकाबला करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे, असे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याऐवजी ती स्वीकारावी. प्रस्ताव प्रलंबित ठेवून नागरिकांना पाणी आणि पशुधनाला चारा मिळण्यापासून वंचित ठेवण्याची कोणतीही सबब चालणार नाही. प्रत्येक कामाची कालमर्यादा निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुष्काळग्रस्त जनतेला त्रास सहन करावा लागल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, महावितरण, जलजीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, प्रशासक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.