धाराशिव, १३ जून: वरुडा रोडवरील शिंदे कॉलेजजवळ रेल्वे कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीवर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टळवला आहे. गुरुवारी रात्री १०:३० वाजता धाराशिवच्या गोवर्धनवाडी मार्गावरून प्रवास करत असताना ओमराजेंच्या लक्षात आले की रस्त्यावर प्रचंड चिखल साचल्यामुळे वाहनांची वाहतूक धोकादायक बनली आहे.
त्या ठिकाणी एक बोलेरो गाडी खोल चिखलात अडकलेली होती, तर एक रिक्षा व दुचाकी घसरून पडलेल्या अवस्थेत होत्या. नागरिकांची अवस्था पाहून खासदार ओमराजे यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून जवळील प्लांटवर जाऊन रेल्वे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी विचारले, “रस्त्यावर इतका चिखल असूनही स्वच्छता का करण्यात आलेली नाही?”
प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आवाज उठवत, ओमराजेंनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी रस्त्याची दयनीय स्थिती निदर्शनास आणून दिली आणि पोलीस निरीक्षक व RTO अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रत्यक्ष रस्ता दाखवत समस्या अधोरेखित केली.
या हस्तक्षेपामुळे संबंधित रेल्वे कंत्राटदाराला त्वरित रस्ता साफ करण्याचे आदेश देण्यात आले आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला. या तत्परतेमुळे त्या रात्री होऊ शकणाऱ्या गंभीर अपघातांना आळा बसला.
नागरिकांकडून ओमराजेंच्या या तात्काळ कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता व जबाबदारी प्रशासनासाठी एक आदर्श ठरत आहे. “हेच खरे जनतेचे लोकप्रतिनिधी!” असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे..