तुळजापूर : महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. वंश मंगल कार्यालय येथे आयोजित या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्यामुळे नागरिकांना अनेक महत्त्वाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध झाला.
शिबिराचे उद्घाटन आमदार रणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या या विशेष अभियानाचा उद्देश महसूल व इतर शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. त्याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १,४०० नागरिकांनी भेट दिली, त्यापैकी १,०५० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला, तर ७४९ नागरिकांचे विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे एकाच ठिकाणी पूर्ण होण्यास मोठी मदत झाली.
शिबिरात नगर परिषद, महसूल विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, कृषी विभाग, परिवहन विभाग, पोलीस प्रशासन, कौशल्य विकास विभाग, पंचायत समिती, पोस्ट कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र कक्षामधून नागरिकांना आवश्यक सेवा, माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
शिबिरात घरकुल योजना, आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, पीक व कृषी योजनांबाबत मार्गदर्शन, दिव्यांग लाभ योजना, मोफत आरोग्य तपासणी, महिला व बालकल्याण योजना, लेक लाडकी योजना, वन विभागाच्या विविध योजना, बचत व विमा योजना, शिधापत्रिका सेवा, डिजिटल ७/१२ वाटप, विविध दाखल्यांचे वितरण, फार्मर आयडी नोंदणी, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती तसेच वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन अशा अनेक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अपर तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत काम केले. त्यामुळे नागरिकांची कागदपत्रे तपासणी, अर्ज स्वीकारणे आणि योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया जलद व सुलभ पद्धतीने पूर्ण झाली.
एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचला. शिबिरातून लाभ घेतलेल्या नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या संकल्पनेला या शिबिरातून प्रभावी स्वरूप मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एकूणच, ‘महाराजस्व समाधान शिबिर’ हे तुळजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून, शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाचा हा एक प्रभावी आणि यशस्वी उपक्रम असल्याचे या शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.