मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४,५०० विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी!

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र पत्रे; छत्रपती संभाजीनगरात १,०००, तर उर्वरित सात जिल्ह्यांत प्रत्येकी ५०० आसनक्षमतेच्या अभ्यासिकांसाठी पुढाकार

धाराशिव | प्रतिनिधी : मराठवाड्यातील ग्रामीण, सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार व अत्याधुनिक अभ्यास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हा मुख्यालयांत एकूण ४,५०० विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही स्वतंत्रपणे पत्रे देऊन संबंधित जिल्ह्यांत अभ्यासिका उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एकावेळी १,००० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, अशी भव्य अभ्यासिका उभारावी. तसेच जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सात जिल्हा मुख्यालयांत प्रत्येकी ५०० आसनक्षमतेच्या सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात याव्यात, अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे.

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मिळणार आधार

मराठवाड्यातील हजारो युवक-युवती एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती तसेच विविध शासकीय व निमशासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शांत अभ्यासाचे वातावरण, आवश्यक संदर्भग्रंथ आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतात. खासगी अभ्यासिकांचे शुल्क तसेच मोठ्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातच सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची मागणी

प्रस्तावित अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भग्रंथ, अद्ययावत ग्रंथसंपदा, इंटरनेटसह डिजिटल अभ्यास सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांगसुलभ प्रवेश तसेच विद्यार्थिनींसह सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आठही पालकमंत्र्यांकडे स्वतंत्र पाठपुरावा

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केवळ मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून न थांबता आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडे स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला आहे. प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात अभ्यासिका उभारण्यासाठी आवश्यक जागा, निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

संबंधित महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या ताब्यातील योग्य जागा अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून द्यावी. जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करावे. यामध्ये इमारत बांधकाम, ग्रंथसंपदा, डिजिटल सुविधा तसेच अभ्यासिकांच्या नियमित संचालन व देखभालीसाठी आवश्यक तरतुदींचा समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

सर्व आठही जिल्ह्यांतील प्रस्ताव संबंधित जिल्हा नियोजन समित्यांच्या आगामी बैठकीत प्राधान्याने ठेवण्यात यावेत. अभ्यासिका उभारणीसाठी पात्र योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार अभ्यास सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रस्तावित ४,५०० आसनक्षमतेच्या अभ्यासिका प्रत्यक्षात उभ्या राहिल्यास ग्रामीण व शहरी भागातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सर्व पालकमंत्र्यांकडे केलेला हा स्वतंत्र पाठपुरावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!