शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील
पुणे : एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या प्रश्नांविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पुल येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने आणि वेळबद्ध निर्णय घेण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना आ. कैलास पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही. त्यांच्या स्वप्नांची किंमत निवडणुकीच्या आश्वासनांपेक्षा मोठी आहे.” आंदोलनात बसलेले बहुतांश विद्यार्थी शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य कुटुंबातील आहेत. आई-वडील शेतात कष्ट करून, प्रसंगी कर्ज काढून मुलांना शिकवतात. मुलांनी शिक्षण घेऊन सरकारी सेवेत जावे आणि कुटुंबाला आधार द्यावा, ही त्यांची अपेक्षा असते. मात्र, परीक्षा देण्याऐवजी विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास गंभीर असून, त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. पेपर बाहेर कसा गेला, तो कुणाकडे पोहोचला, त्याचा फायदा कुणाला मिळणार होता आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणाची प्रशासकीय किंवा अन्य जबाबदारी होती, या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी एमपीएससी अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आहे. अध्यक्षांच्या पदाबाबत घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया असली तरी त्या प्रक्रियेच्या आड विद्यार्थ्यांचे प्रश्न अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नाहीत. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर स्पष्ट, पारदर्शक आणि वेळबद्ध भूमिका जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले.
केवळ काही व्यक्तींवर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी कथित पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीची निष्पक्ष चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित करावी. दोषी कोणत्याही पदावर असला किंवा कोणाच्याही दबावाखाली असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आ. पाटील यांनी मांडली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देण्याऐवजी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्यापेक्षा त्यांच्या मनातील अविश्वास दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांवर लेखी आणि वेळबद्ध निर्णय घेऊन एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आ. कैलास पाटील यांनी मध्यरात्री एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट देऊन मार्गदर्शन केले आणि आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
#MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCExam #PaperLeak #StudentsJustice #स्पर्धापरीक्षा #एमपीएससी #एमपीएससीविद्यार्थी #विद्यार्थीआंदोलन #कैलासपाटील #धाराशिव #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #अंतरसंवादन्यूज #OsmanabadNews