परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार

Spread the love


परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
धाराशिव, दि. 11 –
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विश्वजित पवार यांची राज्य सरकारने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गुरुवारी अधिकृत आदेश जारी केला आहे.
डॉ. विश्वजित गोविंदराव पवार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील अध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र व विषविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम येथून एमबीबीएस व एमडी (फॉरेन्सिक मेडिसिन) शिक्षण पूर्ण केले. एमयूएचएस, नाशिक विद्यापीठाच्या एमडी फॉरेन्सिक मेडिसिन परीक्षेत 2010 मध्ये सुवर्णपदक मिळविले.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात त्यांना 17 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी, रिव्हाइज्ड बेसिक कोर्स, एईटी कॉम आणि सीआयएसपी यांसारखे प्रशिक्षणक्रम पूर्ण केले असून महाविद्यालयातील मेडिकल एज्युकेशन युनिट, अभ्यासक्रम समितीसह विविध समित्यांवर काम केले आहे. महाविद्यालयातील 32 समित्यांपैकी 28 समित्यांवर त्यांनी अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच प्राध्यापकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
कोविड-19 काळात त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे उपअधीक्षक म्हणून काम केले. या काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक संस्थांकडून त्यांना कोरोना वॉरियर पुरस्काराने गौरविण्यात आले. न्यायवैद्यक क्षेत्रात त्यांचा विशेष अनुभव असून विविध वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणांमध्ये तज्ज्ञ साक्षीदार म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या तज्ज्ञ पुराव्याच्या आधारे 16 फौजदारी प्रकरणांमध्ये शिक्षा आरोपींना शिक्षा झाली आहे. सीईएचएटी टीमचे सदस्य म्हणून त्यांनी वैद्यकीय शिक्षणात लैंगिक समानतेच्या दृष्टिकोनाच्या समावेशासाठीही काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी शोधनिबंध सादर केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये एकूण 52 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच एमएलएएम, आयएएफएम आणि केएमएलएस या संस्थांचे ते सदस्य आहेत. डॉ. पवार यांनी आपल्या मूळ पदाची कर्तव्ये व जबाबदार्‍या सांभाळून परभणी अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यपाल यांच्या आदेशानुसार कक्ष अधिकारी प्रविण कांदे यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. डॉ. पवार यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!