धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा

Spread the love



धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करून अल्लाहकडे दुवा करण्यात आली.

ईदगाह कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष नमाज व दुवासाठी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित होते. यावेळी अल्लाहकडे धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांची पिके वाचावीत, शेतीला आवश्यक पाणी मिळावे, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता राहावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी विशेष दुवा करण्यात आली.

जिल्ह्यात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सुरुवातीच्या पावसानंतर पिकांची वाढ सुरू असताना पावसाचा खंड पडल्याने पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या काळात पावसाची मोठी गरज असल्याने शेतकरी पुन्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचा खंड आणखी वाढल्यास शेतीबरोबरच पशुधन आणि पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या विशेष नमाज पठण करून अल्लाहकडे पावसासाठी दुवा केली. तसेच केवळ पावसासाठीच नव्हे, तर देशासह संपूर्ण जगामध्ये अमन-शांती नांदावी, जगातील सर्व जीव सुरक्षित राहावेत, कोणत्याही प्रकारचे संकट मानवजातीवर येऊ नये आणि सर्व समाजामध्ये बंधुभाव व एकोपा कायम राहावा, यासाठीही दुवा करण्यात आली.

पावसासाठी करण्यात आलेल्या या विशेष नमाज व दुवेत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पाऊस पडावा, जिल्ह्यात सुख-समृद्धी नांदावी आणि सर्वत्र शांतता कायम राहावी, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!