पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक

Spread the love


वाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली आहेत. डोळ्यादेखत उभे पीक जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, पिकांसोबतच शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेली उत्पन्नाची आशाही जळून खाक झाली आहे.
जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. खत, बियाणे आणि पेरणीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेतले, तर काहींनी घरातील उपलब्ध धान्य कवडीमोल भावाने विकून शेतीसाठी पैसा उभा केला. यंदा पीक चांगले येईल, उत्पन्न मिळेल, कर्जाचा भार कमी होईल आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र, पेरणीनंतर काही काळ पावसाने साथ दिल्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. तब्बल ३० ते ३५ दिवस पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आणि चांगल्या वाढीला आलेली सोयाबीनची पिके सुकू लागली. सुरुवातीला आज ना उद्या पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. उद्या येईल, परवा येईल, आठ दिवसांनी तरी पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने अखेर उभे पीक डोळ्यादेखत करपून गेले.
शेतकऱ्यांसाठी पोळा हा विशेष महत्त्वाचा सण आहे. बळीराजाचा सण म्हणून पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पोळ्याच्या उत्साहावरही संकटाची छाया दिसून येत आहे. आपल्या सर्जा-राजाला अंघोळ घालण्यासाठी, त्याच्या अंगावर पाणी टाकण्यासाठीही अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या बैलांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता जपत पोळा साजरा करीत आहे.
एकीकडे करपलेली पिके, दुसरीकडे वाढता शेतीचा खर्च आणि डोक्यावर कर्जाचा भार, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पीक विम्याची भरपाई, शासनाचे अनुदान आणि आवश्यक ती आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातचे पीक गेल्यानंतर आता शासनाने तरी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे, अशी आर्त हाक वाशी तालुक्यातील शेतकरी देत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!