धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love



धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित २४० किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वाची प्रगती झाली असून, या रेल्वेमार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे कामही सुरू झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.


मराठवाड्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर राज्य सरकारसह विविध संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधला जाईल. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केल्याप्रमाणे, रेल्वे प्रकल्पांची मंजुरी ही विविध प्रशासकीय टप्प्यांतून पार पडणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याने अंतिम मंजुरी व प्रत्यक्ष काम सुरू होण्याबाबत सध्या निश्चित कालमर्यादा सांगता येणार नाही. मात्र सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने हा प्रकल्प पुढील टप्प्यात पोहोचला असून, मराठवाड्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासंदर्भातील माहिती दिली आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, प्रवासी वाहतुकीबरोबरच कृषी व औद्योगिक मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळेल. परिणामी मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!