जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध

Spread the love

जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध

धाराशिव प्रतिनिधी –

दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक अधिकारांना बाधा आणणारी बाब असल्याची भूमिका पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसंदर्भात त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर शासनाने संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे आहे. आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

“विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता कायम ठेवावी तसेच भरती प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!