रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील

Spread the love

वीस विभागांमध्ये तपासणी व उपचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदानातूनही समाजसेवेचा संदेश

धाराशिव : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहण्याइतके मोठे सुख दुसरे नाही. सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नियमित महाआरोग्य शिबिरे घेण्याचा आपला संकल्प असल्याचे भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,   शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढे बोलताना मल्हार पाटील म्हणाले, तेरणा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी यंदा १५ ते १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किडनी प्रत्यारोपणाची परवानगी मिळाल्यानंतर कळंब येथील एका चिमुकल्यावर तब्बल ५६ लाख रुपयांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. गरजू रुग्णांना आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आपले प्रामाणिकपणे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, तेरणा जनसेवा उपक्रमातून आतापर्यंत सुमारे दोन लाख नागरिकांवर उपचार करण्यात आल्याचे सांगितले. जनसेवा आणि रुग्णसेवेचे हे कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात ‘रक्तात आहे राष्ट्रभक्ती, शुभेच्छा देऊ रक्तदानातून’ या संदेशासह ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ राबविण्यात आला. मल्हार पाटील आणि दत्ता कुलकर्णी यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. भाजपाचे मराठवाडा संयोजक नितीन काळे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आवश्यक असलेला अविरत उपचार यज्ञ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून सुरू केला असल्याचे सांगितले.

शिबिरात औषध वितरण, आयुष, रक्त तपासणी, दंतचिकित्सा, शल्यचिकित्सा, कान-नाक-घसा, मनोविकार, नेत्ररोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, ईसीजी, आयुष्मान भारत योजनेसह सुमारे २० विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले. गंभीर आजाराचे निदान झालेल्या गरजू रुग्णांवर तेरणा रुग्णालय, नेरुळ येथे मोफत उपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्षा नेहा काकडे, राहुल काकडे, सतीश दंडनाईक, नितीन काळे, अनिल काळे, संपत डोके, प्रदीप शिंदे, ॲड. नितीन भोसले, अक्षय ढोबळे, प्रवीण माळी, रवी मुंडे, अभय इंगळे, विलास लोंढे, सुजित साळुंके, अभिजित काकडे, आकाश तावडे, सिद्धार्थ बनसोडे, ॲड. खंडेराव चौरे, धनंजय पाटील, सागर दंडनाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास, कुलदीप मिटकरी, डॉ. एस. एस. मुल्ला, डॉ. डूमणें तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी ६,४७८ रुग्णांची तपासणी

जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानात बुधवारी आयोजित महाआरोग्य शिबिराला जिल्हा आणि परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिवसभरात तब्बल ६,४७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर २२६ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. शिबिरात मेडिसिन, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग, दंतरोग, आयुष, प्रयोगशाळा, स्त्रीरोग, फिजिओथेरपी आदी विविध विभागांद्वारे तपासणी व उपचार करण्यात आले. याशिवाय ३१५ आयुष्मान कार्ड नोंदणी, ३९ एक्स-रे आणि युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह इतर नागरिकांनी रक्तदान करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. शिबिराच्या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. व्यापक आरोग्यसेवा आणि विविध विशेष तज्ज्ञ विभागांच्या उपलब्धतेमुळे या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!