भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी

Spread the love

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी

ग्रामस्थ मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित!

धाराशिव, दि. २१ (प्रतिनिधी) : तालुक्यातील भंडारवाडी येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्याच्या सेवांपासून वंचित राहण्याची वेळ ओढावली आहे. त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळणे आवश्यक तर आहेतच, त्यांचा तो मूलभूत हक्क देखील आहे. त्यामुळे भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्याकडे दि. २१ जुलै रोजी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तर त्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, अनेक नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. असाच प्रकार धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी येथील नागरिकांच्या बाबतीत होत आहे. सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव असूनही या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आजपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, महिला व किशोरवयीन मुलींना आवश्यक आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.

आरोग्य सुविधा घेण्यासाठी ग्रामस्थांना दूरच्या गावात जावे लागत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना दूरवर जाणे शक्य नसल्यामुळे ते औषधोपचार घेणेच टाळतात. त्यामुळे त्यांचा आजार बळावण्याची शक्यता निर्माण होते. एकीकडे प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, भंडारवाडीतील ग्रामस्थ शासनाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.

हा होणारा अन्याय दूर करून भंडारवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर हे केंद्र सुरू करण्यासाठी परिपूर्ण असा प्रस्ताव शासन दरबारी मांडून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!