महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महावितरणच्या मंडळ कार्यालयासमोर शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असतानाही शेतकऱ्यांना दिवसा नियमित, अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्याचा आरोप केला. शेती पूर्णपणे वीजेवर अवलंबून असताना कमी दाबामुळे विद्युत मोटारी सुरू होत नाहीत, ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून महावितरणने तातडीने परिस्थिती सुधारावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी वारंवार होणारे इमर्जन्सी लोडशेडिंग, अनियमित वीजपुरवठा आणि सतत खंडित होणारी वीज यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत असून माता-भगिनींना घरगुती कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच लघुउद्योग आणि व्यापाऱ्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य शासनाने स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले असतानाही अनेक ठिकाणी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर जुने मीटर पुन्हा बसवून देण्याची लेखी मागणी करूनही ती नाकारली जात असल्याचे सांगत, ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार जुने मीटर पुन्हा बसवून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास नियमित, अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करणे, कमी दाबाचा प्रश्न तातडीने सोडविणे, अनावश्यक इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करणे, वारंवार होणारे वीज खंडित होणे रोखण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करणे, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही थांबविणे, लेखी मागणी करणाऱ्या ग्राहकांना जुने मीटर पुन्हा बसवून देणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी, शेतकरी आणि नागरिकांचा संयम आता संपत चालला असून महावितरण व राज्य शासनाने तातडीने प्रश्न निकाली काढले नाहीत, तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, माजी जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, प्रा. दिलीप पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.