जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीचा उलगडा; लातूरमधील सराईत आरोपीसह १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love



धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले आहे. जळकोट येथील भांड्याच्या दुकानात झालेल्या चोरीचा उलगडा करत पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील एका सराईत आरोपीला ताब्यात घेतले असून चोरीतील १ लाख ७० हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पोलीस ठाणे नळदुर्ग गुन्हा क्रमांक २७६/२०२६ (कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता) या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा केला.
या कारवाईदरम्यान नरसिंग दत्तू माने (वय ३५, रा. तगरखेड, ता. निलंगा, जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने इतर साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली. या गुन्ह्यातील सर्व आरोपी लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी चोरीस गेलेली पितळी व तांब्याची भांडी तसेच दोन एलईडी टीव्ही असा एकूण १,७०,०५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, शुभम बिराजदार (TAW) आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!