तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तुळजापूर आगारासाठी मंजूर झालेल्या ०५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास
लोकार्पण करण्यात आलेल्या या नवीन बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. ‘थ्री बाय टू’ (3×2) आसन व्यवस्था असलेल्या या आरामदायी बसमध्ये ५६ प्रवाशांची आसन क्षमता आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ग्रामीण भागातून शहराकडे प्रवास करणारे विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही बस सेवा अत्यंत सोयीची आणि विश्वासार्ह ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाला गती देणे आणि भाविक व नागरिकांना दर्जेदार सेवा देणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” — आमदार राणाजगजितसिंह पाटील
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी तुळजापूर आगार प्रमुख श्री. महेश रामपुरे, श्री. विक्रमसिंह देशमुख, श्री. संतोष बोबडे, श्री. बसवराज धरणे, श्री. नय्यर जहागीरदार, श्री. आनंद कंदले, श्री. निलेश रोचकरी, श्री. नरेश अमृतराव, श्री. शांताराम पेंदे, श्री. राम चोपदार, श्री. राम जवान यांच्यासह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बसेस ताफ्यात आल्यामुळे तुळजापूर परिसरातील प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.