एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

Spread the love

धाराशिव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैध शालेय पासच्या आधारे प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नियमित एसटी बसचा पास असतानाही विद्युत बसमधून प्रवास करण्यास मनाई होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, त्यांना अतिरिक्त तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शालेय पासच्या आधारे नियमित एसटी बसमधून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, विद्युत बसमध्ये या पासधारक विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास परवानगी दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही मार्गांवर नियमित एसटी बस उपलब्ध नसते, तर काही वेळा निर्धारित वेळेत बस येत नाही. अशा परिस्थितीत शाळा किंवा महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्युत बसचा पर्याय निवडावा लागतो. परंतु, वैध पास असूनही त्यांना विद्युत बसमधून प्रवास करण्यास मनाई केली जाते. तसेच स्वतंत्र तिकीट काढण्यास सांगितले जाते, याकडे आमदार पाटील यांनी परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी कुटुंबांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च परवडत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांवर बसमधून खाली उतरण्याची वेळ येत आहे. त्यामुळे त्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महामंडळाकडून शालेय पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असताना केवळ बसचा प्रकार बदलल्यामुळे या सुविधेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे योग्य नाही. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बससेवेवर अवलंबून आहेत. नियमित बस उपलब्ध नसताना विद्युत बसमधून प्रवास करण्याची मुभा नसल्यास विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन विद्युत बसमध्येही वैध शालेय पासधारक विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. याबाबत परिवहन विभागाने योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!