जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शेतकऱ्यांना दर्जेदार खते-बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

Spread the love

धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे उपलब्ध व्हावेत तसेच कृषी सेवा केंद्रांकडून होणारी संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे बियाणे व खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तुळजापूर तालुक्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईचे काँग्रेस कमिटीने स्वागत केले असले तरी केवळ तक्रारीनंतरच कारवाई न करता सर्व तालुक्यांमध्ये नियमित व अचानक तपासण्या करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच खते व बियाणे देण्यात यावेत तसेच त्यांची विक्री एमआरपी दरानुसारच करण्यात यावी. एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या तसेच इतर वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन आणि ऑफलाइन तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. या सुविधांची माहिती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचीही मागणी करण्यात आली.

काही कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना विशिष्ट खत किंवा औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने अशा प्रकारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या उपाययोजनांमुळे शेतकरी अधिक जागरूक होतील, तक्रारी तत्काळ नोंदवतील आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, धनंजय राऊत, ॲड. जावेद काझी, सर्फराज काझी, अभिषेक बगल, शिवाजी गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

#धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज #काँग्रेस #शेतकरी #खते #बियाणे #कृषीसेवाकेंद्र #जिल्हाधिकारी #तुळजापूर #DharashivNews #OsmanabadNews #AntarsanwadNews #Congress #Farmers #Seeds #Fertilizer #Agriculture #Tuljapur #MaharashtraNews #FarmerIssues #AgricultureDepartment #DharashivCongress


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!