धाराशिवमध्ये ‘समता स्वराज’ सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
धाराशिव:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लागावा, या उद्देशाने २३ जून रोजी धाराशिव येथे एका कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “समता स्वराज” सामाजिक संस्था, धाराशिव यांच्या वतीने परिसरातील दोन प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत लाल-बहादूर शास्त्री विद्यानिकेतन, खेड आणि श्रीमती प्रयागबाई पडवळ कन्या प्रशाला, उपळे (मा.) या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
हे साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेच्या सदस्यांनी प्रत्यक्ष प्रशालेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी मनापासून शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.
या सामाजिक व कौतुकास्पद उपक्रमासाठी “समता स्वराज” सामाजिक संस्थेचे सदस्य अभिजीत खुणे, सुमित चंदनशिवे, सिद्धांत राऊत, सुमित कुमार ठाणांबीर, ऋषिकेश जाधव, आणि रितेश खुणे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल दोन्ही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच पालकांकडून संस्थेचे आभार मानले जात असून, त्यांच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.