शिवसेनेच्या वर्धापन दिनी मानवतेचा वसा; बोन मॅरोग्रस्त चिमुकल्यासाठी शिवसेनेकडून २५ हजारांची मदत

Spread the love

प्रतिनिधी तुळजापूर

तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना तुळजापूर शिवसेना तालुका व शहर शाखेने मात्र एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला. अनावश्यक खर्च, बॅनरबाजी आणि दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देत “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्याखाली एका गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.

तुळजापूर शहरातील शेळके कुटुंबातील एका लहान बालकाला बोन मॅरोचा गंभीर आजार असून त्याच्या उपचारासाठी तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत असलेल्या या कुटुंबाची माहिती मिळताच शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी तत्काळ पुढाकार घेतला. वर्धापन दिनावरील खर्च टाळून शिवसेना पक्षाच्या वतीने त्या चिमुकल्याच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी बोलताना अमोल जाधव यांनी, “फूल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केवळ आर्थिक मदत देऊन थांबणार नसून, जोपर्यंत त्या बाळाचे उपचार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शिवसेना शेळके कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनीही त्या चिमुकल्याला लवकरात लवकर योग्य उपचार मिळावेत आणि तो निरोगी आयुष्य जगावा, यासाठी प्रार्थना व्यक्त केली. उपचाराच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील, असा विश्वासही शेळके कुटुंबीयांना देण्यात आला.

आजच्या राजकीय वातावरणात जिथे वर्धापन दिन म्हणजे मोठमोठे बॅनर, जाहिराती आणि कार्यक्रम अशी प्रथा रूढ झाली आहे, तिथे तुळजापूर शिवसेनेने एका आजारी बालकाच्या मदतीला धावून जात सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले. या उपक्रमामुळे शेळके कुटुंबीयांच्या डोळ्यांत आशेचा किरण निर्माण झाला असून परिसरातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

यावेळी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, उपतालुकाप्रमुख विकास जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शहर संघटक नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते, गौरव साळुंखे तसेच शेळके कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

“वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा एका जीवाला आधार देणे अधिक महत्त्वाचे” हा संदेश देणारा हा उपक्रम तुळजापूरकरांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!