जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन ; बँकांशी दोन दिवसांत संपर्क साधावा
धाराशिव,दि.१९ जून (जिमाका) राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ मंजूर केली असून,योजनेची अंमलबजावणी सध्या राज्यभर सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जातून दिलासा देण्यासाठी कर्जमुक्तीचा लाभ प्रदान करण्यात येत आहे.
योजनेनुसार,ज्या शेतकऱ्यांनी दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले असून त्यांची कर्जखाती दि.३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत आहेत तसेच दि.३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही,अशा शेतकऱ्यांच्या एक किंवा अधिक बँकांमधील कर्ज खात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकी रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे,त्यांनी प्रथम दोन लाख रुपयांवरील अतिरिक्त थकबाकी संबंधित बँक किंवा संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.ही अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.अतिरिक्त थकबाकीची परतफेड केल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांना एकवेळ समझोता (OTS) योजना अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे.
दरम्यान,कर्जमुक्ती व एकवेळ समझोता योजनेस पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पोर्टलवर भरण्याचे काम संबंधित बँका आणि संस्थांकडून सुरू आहे.ही प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र,अनेक पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक,मोबाईल क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याने पोर्टलवर माहिती नोंदविण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक,मोबाईल क्रमांक तसेच ॲग्रीस्टॅक क्रमांक तातडीने संबंधित बँक किंवा संस्थेकडे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा व्यवस्थापक अथवा संस्थेच्या सचिवांशी पुढील दोन दिवसांत यासाठी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी आणि शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
*****