आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप

Spread the love

कळंब : येणाऱ्या काळात तंत्रशिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून आयटीआयमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली तर त्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर मोठी मागणी राहील, असे प्रतिपादन कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील साळुंखे यांनी केले.

त्या वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आयटीआय विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सतिश मातने होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे डॉ.सुशील शेळके,आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे तसेच प्रा.सुकेशनी गव्हाणे-मातने उपस्थित होत्या.

पुढे मार्गदर्शन करताना प्राजक्ता पाटील साळुंखे म्हणाल्या की, आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले म्हणजे शिक्षणाचा प्रवास संपला असे नाही. उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी सांभाळत असतानाच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची संधीही घ्यावी. बहिस्त शिक्षणाच्या माध्यमातून पुढील शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. ज्यांना प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांनी त्या क्षेत्रातही प्रयत्न करावेत. हे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी त्यामध्ये प्रतिष्ठा आणि संधी दोन्ही आहेत. यावेळी त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यानचा स्वतःचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला.

प्रा.डॉ.सुशील शेळके यांनी सांगितले की, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT सारख्या साधनांचा वापर करून विविध कौशल्ये आत्मसात करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन स्वतःचा विकास साधावा.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सतिश मातने यांनी सांगितले की,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी कौशल्यसंपन्न असतो. त्यामुळे त्याला मोठ्या कंपन्यांमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक असल्यास आपल्या गावाबाहेर जाऊन काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश म्हेत्रे यांनी केले तर आभार गिरीधर कवडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार शिंदे,सुप्रिया चव्हाण, दीक्षा गायकवाड आणि विनोद कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!