धाराशिव : आई-वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या आणखी एका निराधार चिमुकल्याच्या आयुष्यात अखेर आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला. श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘अंकुर शिशुगृह, धाराशिव’ यांच्या वतीने बाराव्या अनाथ बालकाचा दत्तक विधान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला आणि अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या हृदयस्पर्शी क्षणांची साक्ष देण्यासाठी रुपामाता परिवारातील अँड. अंजली व्यंकटराव गुंड पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दत्तक विधानाची विधीवत पूर्तता करण्यात आली. एका निराधार बालकाला नव्या आई-वडिलांचे प्रेम, सुरक्षित आयुष्य आणि कुटुंबाचा आधार मिळाल्याने संपूर्ण परिसर भावुक झाला होता.
यावेळी बोलताना अँड. अंजली व्यंकटराव गुंड पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आई-वडिलांचे प्रेम हा प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आज या चिमुकल्याला मायेची सावली मिळताना पाहून मन भरून आले. समाजातील प्रत्येकाने अशा निराधार बालकांसाठी पुढे येणे, हीच खरी मानवसेवा आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात संवेदनांचा ठाव घेतला.
कार्यक्रमास डॉ. सचिन रामढवे, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. दिग्गज दापके देशमुख, उद्योजक श्री रामानंद माढेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश वाघमारे,रुपामाता फाऊंडेशनचे गजानन पाटील, अंजुमन हेल्थ केअर सोसायटी चे फेरोज पल्ला, अधिक्षक किरण बहिर तसेच शिशुगृहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या दत्तक सोहळ्याचा साक्षीदार होत नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या बालकाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अंकुर शिशुगृहामार्फत अनेक निराधार व अनाथ बालकांना प्रेमळ कुटुंब मिळवून देण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, समाजातील दानशूर व संवेदनशील व्यक्तींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“एका चिमुकल्याला केवळ घरच नाही, तर आयुष्यभरासाठी मायेची उब आणि प्रेमाची सावली मिळाली,” अशी भावना व्यक्त करत या सोहळ्याची सांगता झाली.