धाराशिव (प्रतिनिधी) : अल्पवयात मोठे यश संपादन करत देवधानोरा गावातील कृष्णा काका क्षीरसागर याची अवघ्या १९ व्या वर्षी पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत असून, गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णाने अत्यंत कमी वयात मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस दाखवत ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्याने कधीही हार न मानता जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्याच्या या यशामुळे देवधानोरा गावाचा मान उंचावला असून, अनेक तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
दरम्यान, आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे कृष्णाचे विशेष अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “वय नव्हे, तर जिद्द मोठी असते,” हा संदेश कृष्णाने आपल्या यशातून दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस दलात कार्यरत होताना कृष्णाने समाजसेवेची भावना जपत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.