पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
धाराशिव : पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर झालेल्या बिनविरोध निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भावनिक फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आनंदासोबतच दिवंगत अजितकाकांच्या आठवणींनी मन व्याकुळ झाल्याचे नमूद केले आहे.
आमदार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अतिशय मिश्र भावनांनी आज मन भरून आलं आहे. आदरणीय अजितकाकांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही. अशा कठीण काळात लहान भाऊ पार्थ यांनी खासदार म्हणून घेतलेली शपथ ही सुनेत्रा आत्यांसाठी मोठा दिलासा ठरणारी आहे. ” पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीबाबत त्यांनी आनंद व्यक्त करत, “ही निवड मनाला उभारी देणारी आहे. कठीण परिस्थितीत पार्थ यांनी धैर्याने सक्रिय राजकारणात पाऊल टाकले आहे. त्यांच्या रूपाने संसदेला एक संयमी, सुशिक्षित आणि विकासदृष्टी असलेला तरुण आवाज मिळणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच त्यांनी अजितकाकांच्या जनसेवेच्या परंपरेचा उल्लेख करत, “अजितकाकांची जनसेवेची तळमळ आणि कामाचा धडाका पार्थ यांच्या माध्यमातून पुढे सुरू राहील, याचा विश्वास आहे,” असे म्हटले.
शेवटी, ही निवड केवळ पद नसून जनतेचा आणि पक्षाचा मोठा विश्वास असल्याचे सांगत त्यांनी पार्थ पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “आपल्या हातून महाराष्ट्र आणि देशाची उत्तम सेवा घडो, हीच आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना,” असे म्हणत त्यांनी पोस्टचा शेवट केला.