तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’ शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love


तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’

शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

तुळजाभवानी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर केली जाणार उभारणी

धाराशिव : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या मॉलच्या इमारत बांधकामासाठी आपल्या महायुती सरकारने १९ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मॉलमुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या आपल्या प्रयत्नांना सरकारने भक्कम पाठबळ दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर उमेद मॉलमुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १५ हजार ६६४ महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत. या समूहांमध्ये १ लाख ४७ हजार ५२९ कुटुंबांतील महिलांचा समावेश आहे. या महिला समूहांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. यामध्ये कृषी उत्पादने, अन्नप्रक्रिया पदार्थ, फळे, भाजीपाला, मसाले, धान्य, मध आणि हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांना नियमित आणि मोठी बाजारपेठ मिळवून देण्याची मागणी आपण मागील वर्षभरापासून लावून धरली होती. आता या उमेद मॉलमुळे या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता येईल. महिलांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल. उत्पादनांची नासाडी कमी होईल. त्याचबरोबर महिलांचे उत्पन्न, रोजगार आणि उद्योजकता वाढण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर हा मॉल उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या नावावर असलेल्या या जागेवर मॉलचे बांधकाम केले जाणार आहे. तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसा मॉलचा दर्शनी भाग तयार करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या मॉलची रचना शहराच्या सांस्कृतिक वारशाशी सुसंगत असणार आहे. हा मॉल केवळ विक्री केंद्र म्हणून मर्यादित राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांसाठी तो एकत्रित बाजारपेठ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना मोठ्या शहरी बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

मॉलच्या बांधकामाचे काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. इमारतीमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन, सौरऊर्जा, पाणी व विजेची बचत आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी रॅम्प, रेलिंग आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक असेल. तसेच महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह स्वतंत्र विश्रांती कक्षाची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

या उमेद मॉलमुळे केवळ उत्पादननिर्मितीपुरते मर्यादित न राहता विक्री, ब्रँडनिर्मिती आणि व्यवसायवाढीच्या संधी माता भगिनींना उपलब्ध होऊ शकतात. तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्थानिक उत्पादनांच्या विक्रीलाही चालना मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील माता भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्यातील उत्पादनांच्या बाजारपेठ विस्ताराला मदत मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.



Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!