धाराशिव, 20 जून 2025 (अंतरसंवाद न्यूज) – तेरणा नगर, ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (संचालित) तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. युनिट क्र.-6 मध्ये आज दिनांक 20 जून 2025 रोजी मिल रोलर पूजनाचा विधी कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री विक्रम उर्फ केशव सावंत यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी त्यांनी मिल रोलर पूजन करून कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार मा. प्रा. डॉ. तानजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना वेळेत सुरू होण्यासाठी नियोजनबद्ध तयारी केली जात असून, मशीनरी मेंटनन्सची कामे जलद गतीने सुरू आहेत. मिल रोलर पूजन हे या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या पूजन कार्यक्रमामुळे कारखान्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक कामगारांनी याआधीच सर्व तांत्रिक कामांना उत्साहीपणे सुरुवात केलेली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पोषक हवामान लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केलेली आहे. त्यामुळे भैरवनाथ शुगर वर्क्सच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
येत्या मंगळवार, दि. 24 जून 2025 रोजी संत श्री गजानन महाराज पालखी व दिंडीचे कारखान्याच्या ठिकाणी आगमन होणार आहे. या निमित्ताने भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर श्री देशमुख, चिफ अकाउंटंट श्री बिराजदार, चिफ केमिस्ट श्री अवाड, सीनियर डिस्टलरी मॅनेजर श्री शिरसाठ, मुख्य शेती अधिकारी श्री पुंड, प्रशासकीय अधिकारी श्री घोगरे, श्री राहुल वाकुरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.