धाराशिव (दि. ७ जून २०२५) : पाटोदा ते धाराशिव जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये एका इसमाने एस.टी. कर्मचाऱ्याची बतावणी करत प्रवाशांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनोज राजेंद्र नागटिळे (रा. करजखेडा मोड, ता. व जि. धाराशिव) याने दि. २८ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास पाटोदा मोड येथे सु. पाटोदा – धाराशिव मार्गावरील बस क्र. MH-20-BL-1342 मध्ये प्रवास करताना बसचालक एस.बी. क्षीरसागर (कर्मचारी क्र. ५६४१) यांची पेमेंट स्लिप दाखवून आपणच ते असल्याचे सांगितले. तसेच, आपण एस.टी. महामंडळाचा कर्मचारी असल्याची बतावणी करत लोकसेवक असल्याचे भासवले.
या प्रकारामुळे महामंडळाच्या नियमांची पायमल्ली झाली असून, प्रवाशांची व महामंडळाची फसवणूक झाल्याची तक्रार अश्विनी नागनाथ बनसोडे (वय ३२, रा. सांगवी, ता. धाराशिव) यांनी ६ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.
—
#फसवणूक #एसटीमहामंडळ #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज