धाराशिव : खरीप हंगाम तोंडावर असताना बाजारात बनावट आणि भेसळयुक्त बियाण्यांचा प्रश्न डोके वर काढतो आहे. शेतकऱ्यांनी यामुळे सतर्क राहून अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
बियाण्यांची खरेदी करताना खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी:
1. अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी: पावतीसह बियाणे खरेदी करावी. पावतीवर पीक, वाण, दर्जा, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे व विक्रेत्याचे संपूर्ण नाव व पत्ता नमूद असणे आवश्यक आहे.
2. बियाण्याचे वेष्टन व दस्तऐवज जतन करावेत: बियाण्याची पिशवी, टॅग, पावती व काही बियाणे नमुने पिकाची कापणी होईपर्यंत सुरक्षित ठेवावेत.
3. सिलबंद पाकिटांची खात्री: बियाण्याची पाकिटे सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावी, जेणेकरून भेसळीची शक्यता कमी होईल.
4. हंगामानुसार शिफारसी: खरेदी करताना बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केलेले आहे का, याची खात्री करावी.
5. सोयाबीन बियाण्याची काळजीपूर्वक हाताळणी: वाहतूक व हाताळणी दरम्यान इजा झाल्यास उगमशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
6. वाढीव दर व कमी वजनाच्या निविष्ठा टाळा: छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास किंवा इतर शंका असल्यास त्वरित जवळच्या कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास नुकसान टाळून दर्जेदार उत्पादन घेणे शक्य आहे. कृषि विभागाकडून यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.