पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देवू नका – आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Spread the love

धाराशिव :

पिण्याच्या पाण्यासाठी कोणाचीही गैरसोय होणार नाही याचे कटाक्षाने पालन करावे, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून नागरिकांना पायपीठ करायला लागू नये यासाठी विहिर/बोअर अधिगृहण, टँकर यासह आवश्यक त्या उपाय योजना तातडीने राबविण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काल दि. १३/०३/२०२४ रोजी धाराशिव व तुळजापूर येथे दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काल तहसिलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह तालुका स्तरावरील विभाग प्रमुखांची धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहामध्ये तर तुळजापूर येथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बैठक घेतली. तालुक्यातील सर्व गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा प्रश्नवलीच्या माध्यमातून भरून घेतला. त्यामुळे कुठल्या गावात किती विहीर, बोअरवेल यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे, पाणी टंचाई किती आहे, टँकरची आवश्यकता आहे का, रोजगार हमी योजनेची कामे, चाऱ्याची उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली.

टंचाईच्या अनुषंगाने गरजेनुसार अधिग्रहन अथवा टँकर मागणी करण्यासंदर्भात सरपंचांनी ग्रामसेवकांना माहिती देणे, ग्रामसेवकांनी संबंधित गट विकास अधिकारी यांना माहिती तात्काळ देणे आणि ती माहिती तहसीलदार यांना कळवणे अशा बैठकीत सूचना देण्यात आल्या. यामध्ये दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे, बोअरवेलचे  आधिग्रहणाचे बिल मिळाले नाही त्या बाबतीत देखील लवकरच मार्ग काढण्याबाबत उपस्थित सरपंचांना अवगत केले.

पुढील काळात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. बैठकीमध्ये जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करण्याच्या सूचना दिल्या.  दुष्काळाच्या झळा सर्वसामान्य गावकऱ्यांना बसणार नाहीत, दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याचे पाणी, हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील बैठकीस नितीन काळे, उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे, तहसीलदार धाराशिव मृणाल जाधव, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग धाराशिव सरवदे, गटविकास अधिकारी कांबळे, माजी सभापती बालाजी गावडे, तसेच तुळजापूर येथील बैठकीस तहसीलदार तुळजापूर अरविंद भोळंगे, मुख्याधीकारी लक्ष्मण कुंभार, नायब तहसीलदार संताष पाटील, पाणी पुरवठा उप अभियंता भोई, महिला बालविकास अधिकरी गोरे, पशु वैद्यकीय अधिकारी क्षीरसागर, संतोष बोबडे, ‍दिपक आलुरे, विक्रमसिंह देशमुख, राजकुमार पाटील, वसंत वडगावे, विलास राठोड यांच्यासह धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील सरपंच, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!