धाराशिव,दि.३ (प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील युवक-युवती,शेतकरी आणि पशुपालकांसाठी कुक्कुटपालन व्यवसायातून स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.कुक्कुटपालन व्यवसायाला आधुनिक तांत्रिक ज्ञानाची जोड मिळावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावावे,या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग,धाराशिव अंतर्गत ‘सघन कुक्कुट विकास गट’ यांच्या वतीने पाच दिवसीय ऑनलाईन कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाखांतील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या शेतकरी व पशुपालकांनी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी ६ जुलै २०२६ ते १० जुलै २०२६ असा पाच दिवसांचा असून,प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी १२०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे,शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत विविध लाभ मिळविण्यासाठी या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभागी होणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
पात्र व इच्छुक पशुपालक,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि कुक्कुटपालन व्यवसायात भविष्य घडवू इच्छिणाऱ्या तरुणांनी आपल्या नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी तातडीने संपर्क साधून अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन पशुसंवर्धन विभाग,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात कमी भांडवलात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते.अशा परिस्थितीत शासनमान्य प्रशिक्षण,आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन आणि त्यासोबत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ मिळविण्याची ही संधी इच्छुक युवक व पशुपालकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.