धाराशिव प्रतिनिधी : राज्य सरकारने नुकतीच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली असली, तरी शासनाने घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफीच्या जीआरमधील सर्व जाचक अटी शिथिल करून सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे संघर्षवादी आमदार रोहितदादा पवार यांनी केली.
धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथे 29 जून रोजी होणाऱ्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ या भव्य शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांनी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांच्या प्रश्नांवर भाष्य केले. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून वाढती महागाई रोखण्यात राज्य व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या जाचक कर्जमाफी धोरणाचा निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले.
आमदार रोहित पवार यांनी राज्यातील वाढत्या महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वादांमुळे विकासकामे रखडली असून जिल्ह्याला सक्षम आणि विकासाभिमुख पर्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगर येथे 29 जून रोजी होणाऱ्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संवाद बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्यासह पक्षाचे राज्य व जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांनी केले.