धाराशिव, दि. २३ जून : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे.
जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकारी हे आमदार राणा जगजितसिंह पाटील व भारतीय जनता पक्षाला पूरक राजकारण करत असल्याचे आरोप यापूर्वी होत होते. अशा पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या निर्णयामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात जिल्हा कार्यकारिणीची नव्याने पुनर्रचना होणार असून, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर समर्थकांना महत्त्वाची पदे दिली जाऊ शकतात, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.