कायद्याची संक्षिप्त माहितीसाठी आयोजित कार्यशाळेस प्रतिसाद
धाराशिव,दि २९ मे (जिमाका) जिल्ह्यात सामाजिक जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.मात्र, वेगवेगळ्या कारणावरुन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समुहातील काही व्यक्तींवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांच्यावर अन्याय,अत्याचारच होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरीसर केंद्राच्या प्रा.ॲड.मंजुषा साखरे यांनी केले.
आज २९ मे रोजी धाराशिव येथील प्रशासकीय इमारतीमधील सामाजिक न्याय भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम,१९८९ सुधारित अधिनियम २०१५ व सुधारित नियम २०१५ आणि इतर कायद्याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी आयोजित नागरी मार्गदर्शन कार्यशाळेत प्रा.ॲड.श्रीमती. साखरे बोलत होत्या.धाराशिव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय कांबळे,छत्रपती संभाजीनगर विभागाच्या नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार,प्रभारी पोलीस उपअधीक्षक पी.बी.सोनवणे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,महिला व बालविकास कार्यालयाच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.ॲड.श्रीमती.साखरे म्हणाल्या की,स्वातंत्र्यापूर्वी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या समूहावर अन्याय अत्याचार होत होते,असाच प्रकार स्वातंत्र्यानंतर ही सुरू होता.त्याला आळा बसविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये नागरिक संरक्षण कायद्याची तरतूद केली.मात्र,अन्याय अत्याचार होत असल्यामुळे १९८९ ला अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आणला. त्यानंतर २०१५ भारतीय न्याय संहिता हा कायदा आणला गेला.त्याची अंमलबजावणी होऊ लागल्यामुळे अनुसूचित जाती व जमातीवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुळात यांच्यावर अन्याय केले जाऊ नयेत यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विशेष म्हणजे एस.सी.,एस.टी.महिलांवर आर्थिक व मानसिक छळ या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला तर तो ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह आरोपीस तात्काळ अटक करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असल्याचे ॲड.श्रीमती.साखरे यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की,या केसेस विशेष न्यायालयाअंतर्गत चालवून त्याचा न्याय-निवडा लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच पोलिसांनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर अत्याचार करणाऱ्यांना आपोआप जरब बसून भीती निर्माण होते.जर कायद्याची भीती निर्माण झाली तर कोणावरही अन्याय होणार नाही.त्यामुळे अत्याचाराला आळा घालायचा असेल तर माणूस म्हणून जगणे आवश्यक असल्याचे प्रा.ॲड.साखरे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास विभागांतर्गत वन स्टॉप केंद्राच्या प्रियंका जाधव म्हणाल्या की,पुरोगामी महाराष्ट्रात महिला होणारी दिवसाच्या आर्थिक गंभीर बाब असून महिला व मुली सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.महिलांना आजही दुय्यम स्थान असून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.तर पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे मालमत्ता देखील त्यांच्या नावावर नसल्याची खंत व्यक्ती केली.मात्र प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत असून गर्भाशयापासून स्त्रियांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.स्त्रीचे अपहरण आणि छेडछाड आधी प्रकार रोखण्यासाठी स्त्रियांनीच स्वतःच्या सुरक्षेसाठी सजग बनायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.सोशल मीडियावर बऱ्याच महिलांना अवमानास सामोरे जावे लागत असून ते प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांनी शिक्षण घेऊन शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनावे.त्यासाठी पुरुषांनी स्त्रियांच्या पाठीमागे खंबीर उभारावे,असे आवाहन करत त्या म्हणाल्या की,स्त्रियांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे आहेत,त्याचा आधार घ्यावा. तसेच कायद्याची माहिती जाणून घेऊन होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करावा,असे श्रीमती.जाधव यांनी सांगितले.
प्रज्ञा बनसोडे यांनी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले असून ही गंभीर बाब आहे. अक्षय तृतीयापासून आजपर्यंत ३२ विवाह प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बालविवाह कोणत्याही जातीत होऊ नयेत यासाठी सामूहिक प्रयत्न करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.बाल वयातच मातृत्व लादले जात असल्यामुळे विवाहानंतरचे दुष्परिणाम कोणी रोखू शकत नाही. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावस्तरीय बालविवाह ग्राम दक्षता समितीने होणारे बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याबरोबरच इतर नागरिकांनी देखील जर अशा पद्धतीचा विवाह होत असेल तर १०९८ या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करावा,असे आवाहन श्रीमती. बनसोडे यांनी केले.
यावेळी राजाभाऊ ओहाळ,सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे,रामभाऊ लगडे, मारुती बनसोडे,सुनील काळे व अजिनाथ राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी तर सूत्रसंचालन पीसीआर विभागाचे हेडकॉन्स्टेबल मधुकर शेवाळे यांनी केले.उपस्थितांचे आभार बार्टीचे प्रकल्प संचालक तुषार कदम यांनी मानले.या कार्यशाळेस जिल्ह्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.