दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे

Spread the love


कळंबः तालुक्यातील दहिफळ येथे जिल्हा परिषदेची माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी एकमेव शाळा आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी उच्च शिक्षणाचा एकमेव पर्याय असलेल्या या सरकारी शाळेत एकही महिला शिक्षीका नाही. विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता व शैक्षणिक हिताच्या दृष्टीने किमान एक महिला शिक्षिका उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कळंबच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांनी जिल्हा परिषद, धाराशिव येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना दिलेल्या निवेदना द्वारे ही बाब निदर्शनास आणुन देत नमूद केले आहे की, दहिफळ व पंचक्रोशीतील अनेक मुली या शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून त्यांना आरोग्य, वैयक्तिक समस्या तसेच सुरक्षिततेच्या बाबतीत संवाद साधण्यासाठी महिला शिक्षिकेची गरज आहे. सध्या शाळेत महिला शिक्षिका नसल्यामुळे विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, शाळेत तातडीने किमान एक महिला शिक्षिकेची नियुक्ती किंवा बदली करण्यात यावी, तसेच ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनाद्वारे सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिण्याभरातच नविन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षिका उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वस्त केल्याचे प्रा.तुषार वाघमारे यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!