धाराशिव : अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.