तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचते. सध्या वाढत्या उन्हामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना उष्म्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पाणपोईद्वारे भाविकांना थंड व स्वच्छ पाणी देण्यात येत असून, उन्हाळा संपेपर्यंत ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. “ही केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेली सेवा आहे,” असे मत तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शहर संघटक नितीन मस्के, शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा समाजोपयोगी कामांमध्ये पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
तुळजापूरमध्ये सुरू करण्यात आलेली ही पाणपोई सध्या भाविकांसाठी मोठा दिलासा ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.