धाराशिव ता. 9: शहरातील मतदाराना त्यांच्या प्रभागात मतदान करण्यासाठी आता मोठी अडचण होणार आहे. कारण एका प्रभागातले मोठ्या प्रमाणावरील नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. 2022 च्या प्रभाग रचना प्रमाणे मतदारही ठेवणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग रचना तीच असताना मतदार याद्यामध्ये मोठा घोळ झाला असा आक्षेप महाविकास आघाडीने घेतला आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्याज शेख, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव आदि उपस्थित होते.
यावेळी आघाडीच्यावतीने सांगण्यात आले की, 31 जुलै 2022 ला मतदार यादी आक्षेपसह प्रसिद्ध झाली होती. प्रभाग रचना निश्चित करताना तीच प्रभाग रचना गृहीत धरलेली आहे, मग मतदार याद्यासुद्धा त्याच रचनेनुसार निश्चित करणे आवश्यक होते. पण प्रशासनाने याद्या करताना मोठा घोळ घातला आहे. त्यामुळं नागरिकांना मतदान केंद्र शोधणे अवघड जाणार आहे. साहजिकच मतदानाची टक्केवारी देखील कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने केलेल्या अक्षम्य चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यावर त्यांनी आक्षेप गृहीत धरून योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे असे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे.