उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे), दि. ५ ऑक्टोबर २०२५ (रविवार) —
पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस स्टेशन शेजारी चार वाहनांचा भीषण अपघात झाला. सोयाबीन तेलाने भरलेला १६ टायरचा टँकर (क्र. MH-43 CK 8903) अनियंत्रित होऊन थेट टायर दुकानात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टँकर सोलापूरच्या दिशेने जात असताना समोर अचानक वाहन थांबल्यामुळे चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नवीन बनवलेल्या डिव्हायडरजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने प्रथम दोन चारचाकी आणि एक दुचाकीला ठोकर दिली, त्यानंतर अमर टायर दुकानात शिरला.
अपघातात टँकर चालक लक्ष्मण वर्मा (वय ३१, रा. बलरामपूर, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे. नागरिकांच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल अशिष उल्लाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात अमर टायर दुकानाचे सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानात नुकत्याच बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग मशिनरीचा चक्काचूर झाला. साक्षीदारांच्या मते, “टँकर दुकानात घुसल्यावर जोराचा आवाज आणि धूर झाला. अपघात दिवसा झाला असता, जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली असती.”
टँकरमध्ये सुमारे ३५ टन सोयाबीन तेल भरलेले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.