छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी – डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

Spread the love

Dharshiv:


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मतदार नाव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी सर्व पात्र पदवीधरांना आवाहन केले आहे की, “लोकशाहीत सजग आणि सुशिक्षित मतदारांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र पदवीधरांनी वेळेत आपली नोंदणी करून लोकशाही बळकट करावी.”

या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. ०१ नोव्हेंबर २०२२ पूर्वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले किंवा तीन वर्षांची पदविका पूर्ण केलेले आणि मराठवाडा विभागात वास्तव्यास असलेले नागरिक या नोंदणीस पात्र आहेत.

नोंदणीसाठी संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म क्रमांक १८, पदवी प्रमाणपत्राची प्रत, पासपोर्ट साईज फोटो, तसेच ओळखपत्र (आधार कार्ड / मतदार कार्ड) जमा करावे लागतील. नावात बदल झाल्यास गॅझेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड सादर करणे आवश्यक आहे.

डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी सांगितले की, “पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी दरवेळी नव्याने तयार केली जाते. त्यामुळे मागील निवडणुकीत नाव नोंदवलेले असले तरी पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक आहे.”

शिक्षित समाजाने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी सर्व पदवीधरांना नोंदणी करून सक्रिय नागरिकत्वाचे भान राखण्याचे आवाहन ही डॉ.पाटील यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!