वाशी तालुका │ सततच्या पावसामुळे पिके पाण्यात बुडून नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट कोसळले आहे. वाशी तालुक्यातील पारा येथील शेतकरी बजरंग त्रिंबक चौधरी यांच्या दुभती गाईचा वीज पडून मृत्यू झाला.
शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) सकाळी साडेनऊच्या सुमारास वीज कोसळून हा प्रकार घडला. चौधरी यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बांधलेली सहा वर्षांची दुभती गाय जागीच मृत्यूमुखी पडली. गाईचा रंग काळा बांडी असून कपाळावर पांढरा ठिपका व छोटे गोल आकाराचे शिंगे असल्याचे सांगण्यात आले. मृत गाईची किंमत सुमारे 60 हजार रुपये इतकी आहे.
सदर गाय दूध देत असल्यामुळे चौधरी कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्या दुधावर चालत होता. अशा परिस्थितीत या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाने प्रचलित नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.