धाराशिव :
भूम, परांडा व वाशी (जि. धाराशिव) तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसह घरांची पडझड झाली, जनावरे वाहून गेली आणि अनेक कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला आहे. काही कुटुंबे कबाला मिळालेल्या घरात राहत असून त्यांच्याकडे स्वतःची शेतीही नाही; त्यामुळे ते अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. या संकटाच्या काळात काँग्रेस कमिटीच्या वतीने उमेशराजे निंबाळकर व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करून शेतकरी व गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तातडीची आर्थिक मदत केली.
उमेशराजे निंबाळकर यांनी आंबी, चिंचोली, चिंचपूर (ढगे), बेलगाव, वाघे गव्हाण, कपिलापुरी, करंजा तसेच वाशी तालुक्यातील जणकापूर व पारगाव या गावांना भेट दिली. त्यांनी बांधावर आणि घराघरांत जाऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहिले आणि काही कुटुंबांना थेट मदत पोहोचवली. यामध्ये जनावरांच्या चार्यासाठी आर्थिक सहाय्यही देण्यात आले.
या पाहणी व मदत उपक्रमात काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, परंडा तालुकाध्यक्ष ॲड. हनुमंत वाघमोडे, कार्याध्यक्ष ॲड. अजय खरसडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अवधूत क्षीरसागर, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष समीयोद्दीन काझी, अध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापुरकर, ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे, विद्यार्थी काँग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष मुशरफ सय्यद, बाळासाहेब देशमुख, सेवादलाचे लक्ष्मण शिंदे, पल्लू काकडे, अभिषेक बागल तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यात उमेशराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या तसेच शेती नसलेल्या गरजू कुटुंबांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस कमिटी व उमेशराजे निंबाळकर यांच्या या तातडीच्या मदतकार्याचे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.