धाराशिव :
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उजनी येथे पाहणी दौरा केला. या दौऱ्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
यावेळी आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांची झालेली परवड स्पष्टपणे मांडत सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. “पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा. होत नव्हतं तेवढं वाहून गेलंय, जीव वाहून गेलेत, आता उरलेली आशा तरी वाहून जाऊ देऊ नका,” असे ते म्हणाले.
याबाबत आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाहणी दौऱ्यावर थेट टीका केली. त्यांनी सरकारला तातडीने ठोस मदत जाहीर करण्याचे आवाहन केले.
आमदार पाटील यांनी पुढील ठोस मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या :
धाराशिव जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.
सर्व निकष बाजूला ठेवून पंजाब सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सरसकट एकरी २०,००० रुपये मदत द्यावी.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने करावी.
अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना भरपाईच्या चौकटीत समाविष्ट करावे.
मृत व नुकसानग्रस्त पशुधनाची भरपाई बाजारभावानुसार दिली जावी.
उद्ध्वस्त झालेले रस्ते, पूल, तलाव, बंधारे, विजेचे खांब-रोहित्र यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम राबवावा.
पिकविमा योजनांच्या निकषात बदल करून ती शेतकऱ्यांसाठी परिणामकारक व उपयोगी करावी.
आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, “आज शेतकरी फक्त अडचणीत नाही तर पूर्णपणे उध्वस्त अवस्थेत उभा आहे. ही वेळ केवळ दिलासा देण्याची नाही, तर ठोस निर्णय घेऊन तातडीची मदत करण्याची आहे.”