१०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड , प्राप्त १४ प्रतिकृतींमधून तज्ज्ञांची समिती करणार निवड

Spread the love

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी ,

 

 tuljapur:

कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यासाठी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीची सोमवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील शिल्पकारांनी सादर केलेल्या एकूण १४ शिल्प प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड समितीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार सर्व भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.’मित्र’चे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या शिल्पाची उभारणी केली जात आहे.

 

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत तुळजाभवानी मातेचे १०८ फुट उंचीचे ब्राँझ धातूचे शिल्प साकारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाचे हे शिल्प असणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत शिल्पकारांना अडीच ते तीन फूट उंचीचे फायबरचे मॉडेल कला संचालनालयाकडे (मुंबई) १ ते ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या प्रसंगावर हे शिल्प उभारण्यात येणार आहे, त्याचे धार्मिक, एेतिहासिक महत्व मोठे आहे. त्यातील बारकावे अधीक गांभीर्याने समजून घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिल्पकारांनी केली होती. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. दरम्यान १४ प्रतिकृती प्राप्त झाल्या आहेत. या १४ शिल्पांतून ५ शिल्प निवडण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती.

 

प्राप्त झालेल्या १४ शिल्पांतून ५ शिल्पांची निवड करण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबईतील कला संचालनालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी निवडलेल्या शिल्पाची प्रतिकृती श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या कार्यालयात सादर करण्यात यावी, असे पत्रही श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहे.

 

ख्यातनाम तज्ञांचा इतिहासकारांचा समितीत सहभाग

 

तुळजाभवानी मातेच्या धार्मिक आणि अध्यात्मिक लौकिकाला साजेसे शिल्प साकारण्यासाठी ख्यातनाम तज्ञांसह नामांकित इतिहासकारांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश वडजे, मुंबई येथील सर जे.जे. कला. वास्तुकला व अभिकल्प विद्यालयाचे प्रभारी कुलसचिव शशिकांत काकडे, सेवानिवृत्त प्रा. नितीन मेस्त्री, प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे (पुणे), मुंबईतील शिल्पकार अजिंक्य घोलकर, तुळजापूरचे तहसीलदार तथा तुळजाभावनी मंदिर समितीचे विश्वस्त अरविंद बोळंगे आदींचा या समितीत समावेश असणार आहे.

 

 

संग्रहालयासह माहिती केंद्रही उभारले जाणार

 

या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे  प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा देखील अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे.हे प्रेरणादायी आणि भव्य शिल्प ३ मजले इमारती एव्हढ्या आकाराच्या बेसमेंटवर उभारले जाणार आहे.या बेसमेंटच्या आता एक संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.तसेच २० एकर जागेवर आकर्षक बगीचा करण्यात येणार आहे, सोबत आकर्षक प्रकाश योजना केली जाणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!