जिल्हा स्त्री रुग्णालयात जनुुकीय तपासणी प्रयोगशाळा , देशातील सातवी, राज्यातील पहिली प्रयोगशाळा, जन्मापूर्वीच होणार अनुवंशिक विकाराचे निदान

Spread the love

धाराशिव, : – अनुवंशिक विकारांमुळे बाळांच्या वाट्याला येणार्‍या अनेक आजारांचे निदान आता जन्मा पूर्वीच होणार आहे. बाळाच्या जन्मापूर्वी ज्यांना निदान करणे शक्य झाले नाही, त्यांना बाळाच्या जन्मा नंतरही तातडीने उपचार करता यावेत, यासाठी विविध तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी धाराशिवमध्ये अद्ययावत अशी जनुकीय तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. देशातील ही सातवी आणि राज्यातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे. त्यामुळे जन्मापूर्वीच बाळांमध्ये असलेले अनुवंशिक विकार शोधून दूर करता येवू शकणार आहेत.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुवंशिक रोग प्रशासनाअंतर्गत येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात ‘निदान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागामार्फत हे अनुवंशिक निदान व समुपदेशन केंद्र चालविले जात आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जैव तंत्रज्ञान विभाग ही या प्रयोगशाळेची नोडल एजन्सी आहे. प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर तपासणी त्याचबरोबर वारसाने मिळालेल्या अनुवंशिक विकारांसाठी या केंद्रामार्फत विविध तपासण्या आणि उपचार केले जाणार आहेत.

त्यामुळे दुर्मिळ आणि अनुवंशिक रोगांचे वाढते ओझे कमी होणार आहे. लवकर निदान, प्रतिबंध आणि अद्ययावत वैज्ञानिक आणि आण्विक औषधांच्या वापरांमुळे जलद उपचार हा या उपक्रमाचा सर्वात मोठा हेतू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. रिचा अशमा, शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंंद्रसिंह चौहान आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर , डॉ. लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा सुरू आहे.

दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीची अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून या चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी पाच तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. अशक्तपणा, कावीळ, दम लागणे, हाडांची विकृती, थकवा, पांढरी पडलेली त्वचा, बिटा थेलेसीमिया या सगळ्या आजारांची तपासणी या प्रयोगशाळेत मोफत केली जाणार आहे. त्यामुळे मतीमंदता तसेच इतर गंभीर आजारांचे लवकरात लवकर निदान होईल आणि उपचार करणे सोपे होणार आहे.

बाळ जन्मन्यापूर्वी किंवा नवजात बाळांच्या जन्मानंतर 72 तासांच्या आत रक्ताचे नमुने घेवून ही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कन्जनाईटल हायपोथायरॉईडीझम, गॅलेक्टोसेमिया, बायोटिनीनडेसची कमतरता, कन्जनाईटल एड्रिनल हायपरप्लारिया, जी सिक्स पीडी एन्झाइमची कमतरता आदी विकारांचे तातडीने निदान होणार आहे.

जैव तपासणी झाल्यामुळे अनुवंशिक आजारांपासून नवजात बालकांचा बचावही या प्रयोगशाळेच्या माध्यमातून होणार आहे. नीती आयोगाअंतर्गत आकांक्षित जिल्हा असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात जनुकीय तपासणीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 2021 साली मंजूर करण्यात आलेली ही प्रयोगशाळा आता कार्यान्वित झाली आहे.

गरोदर माता आणि नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी डॉ.अनिल चव्हाण, डॉ.संजय नलावडे, डॉ. रामढवे , डॉ.सूर्यवंशी, तसेच परिचारिका मराठे, परिचारिका ढोणे, परिचारिका जाधव परिश्रम घेतात.या प्रयोगशाळेत व्यवस्थापक साहिल जुवेकर, परिचारिका अर्चना थिटे, लॅब टेक्निशियन निलेश कदम, सागर नन्नवरे तर डाटा एन्ट्री ऑपरेटर साहिल रायकर काम पाहतात.

मागील चार महिन्यांत 502 बालकांच्या तपासण्या
ग्रामीण, शहरी, आदिवासी भागातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर अद्ययावत उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत मागील चार महिन्यांत 502 बालकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. बाळाच्या टाचेतून रक्ताचे कोरडे ठसे घेवून या तपासण्या केल्या जातात. 502 पैकी 22 बालकांच्या रक्त अहवालात दोष आढळून आले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय तज्ञांच्या निगराणीखाली तातडीने उपचारही सुरू करण्यात आले आहेत. तसेच 40 गरोदर मातांचे रक्तनमुने बाळंतपणापूर्वी घेण्यात आले आहेत.

गर्भवती मातांंसाठी मोफत तपासणी ः डॉ. स्मिता गवळी

अनुवंशिक विकारामुळे तीव्र रक्ताशय, श्वसनाचे विकार, सतत आजारी पडणे, हृदयाचे विकार, कमकुवत हाडे, लालपेशीचे आजार, मानसिक आजार, डाऊन सिंड्रोम असे अनेक आजार बळावतात. अशा बाळांना दरमाह रक्तही द्यावे लागते. जन्मापूर्वीच या आजाराचे निदान व्हावे, यासाठी गर्भवती मातांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. या तपासण्या पूर्णतः मोफत आहेत. ज्यांना गरोदरपणात तपासणी करणे शक्य झाले नाही, अशांनी बाळ जन्मल्यानंतर 72 तासात तपासणी करून घेतल्यास पुढील उपचारासाठी त्याची मदत होवू शकते. त्यामुळे या जनुकीय प्रयोगशाळेचा लाभ गर्भवती मातांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!