धाराशिव (प्रतिनिधी) :
जुलै महिन्यात पालकमंत्री प्रा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालेल्या शववाहिनी सेवेला सुरू होताच अक्षरशः कुलूप लागले आहे. मार्च 2025 मध्ये आरोग्य विभाग महाराष्ट्राच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिन्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नगर परिषदेकडे हस्तांतर केल्या. मात्र, नगर परिषदेकडे चालक उपलब्ध नसल्याने या सुविधा बंद अवस्थेत आहेत.
सध्या नगरपालिकेच्या ताब्यात असलेली शववाहिनी इतर बंद पडलेल्या गाड्यांसह पार्किंगमध्ये धूळ खात उभी आहे. मागिल आठवड्यात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी या सेवेसंदर्भात काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तर आज दि.३१ आगस्ट रोजी स्वच्छता विभाग प्रमुख मेहेर यांनी “चालक उपलब्ध नसल्यामुळे शववाहिनी बंद आहे, याबाबत आरोग्य विभागाला कळविले आहे,” असे स्पष्टीकरण दिले.
या निष्क्रियतेमुळे गरीब नागरिकांवर अन्याय होत आहे. मृतदेह घरी नेण्यासाठी त्यांना हजारो रुपयांचा खर्च करावा लागत असून शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात आहे. गाडी न वापरल्याने तिचे आयुर्मान कमी होऊन ती निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजे, शहरातील एका वृद्ध महिलेला उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरी पोहोचवण्यासाठी शववाहिनी संदर्भात नगरपालिकेला विचारणा केली असता ड्रायव्हर नसल्याचे त्यांनी सांगून प्रशासनाला पत्र दिले आहे असे सांगत नगरपालिका आरोग्य विभागातील अधिकारी मेहेर यांनी हात झटकले आहेत.
शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गरीब नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. लोकसेवा ध्येयाला हरताळ फासला गेला असून, शववाहिनी सेवा सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.