धाराशिव :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे प्रथमच हाडाची सर्वात मोठी टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. बालाजी भराटे व त्यांच्या संपूर्ण टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी मा. अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान व वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाकाळ सर यांच्या पुढाकारातून ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत रुग्णासाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली.
गौर (जि. धाराशिव) येथील ६२ वर्षीय हरिभाऊ असकुले यांना चालताना खुब्याला तीव्र वेदना होत होत्या. रुग्णालयात दाखल करून तपासणी केल्यानंतर टोटल हिप रिप्लेसमेंट हा एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट झाले. बाहेर या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला असता, मात्र सरकारी रुग्णालयात ही सेवा अगदी मोफत उपलब्ध झाली.
विशेष म्हणजे, धाराशिव येथे प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधी डॉ. भराटे यांनी येथेच मणक्याची मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली होती. या वेळी देखील त्यांनी रुग्णावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. ऑपरेशननंतर फक्त दुसऱ्याच दिवशी रुग्णाला वजन देऊन चालता आले, तसेच खुब्याचे दुखणेही पूर्णपणे कमी झाले.
या शस्त्रक्रियेसाठी अस्थिरोग विभागातील डॉ. बालाजी भराटे, डॉ. आकाश भाकरे, डॉ. सुयश इंगळे, डॉ. ओंकार केरकर, डॉ. सिद्धांत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भूल विभागप्रमुख डॉ. पुष्पा अग्रवाल, तसेच डॉ. गणेश खंडारकर, डॉ. दीप्ती शिंदे यांच्यासह परिचारिका प्रेमा निंबाळकर, सुवर्णा देशमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनीही विशेष सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मा. अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान व मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाकाळ यांनी संपूर्ण अस्थिरोग टीमचे कौतुक केले. रुग्ण व नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयात इतक्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी झाल्याबद्दल सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.