धाराशिव :
इतिहासात अभिमानाने नोंद असलेला नळदुर्ग किल्ला आज दुरवस्थेत सापडला आहे. सुमारे १२६ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी फक्त तीन कर्मचारी असल्याने कामाचा ताण प्रचंड आहे.
किल्ल्याच्या तटबंदीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली असून, आतील भागात झुडपे वाढल्यामुळे किल्ल्याचा देखावा हरवला आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना अस्वच्छता आणि अव्यवस्था दिसून येते.
दर आठवड्याला १५ ते १६ हजार पर्यटक छत्रपती शिवाजीनगर विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील या ऐतिहासिक ठिकाणी भेट देतात. पावसाळ्यात सुरू झालेला प्रसिद्ध नरमादी धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची संख्या आणखी वाढत आहे. मात्र, किल्ल्यावरील सोयीसुविधा अपुऱ्या असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वी किल्ला सोलापूर येथील एका कंपनीकडे दहा वर्षांसाठी देखभाल व सुशोभीकरणासाठी देण्यात आला होता. त्या काळात काही प्रमाणात कामे झाल्याने किल्ल्याचा देखावा सुधारला होता. पण कंपनीची मुदत संपल्यानंतर पुन्हा दुरवस्था वाढली आहे.
इतिहासदृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणी अनेक मूल्यवान वास्तू व वस्तू आहेत. तरीसुद्धा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमी सांगतात. याशिवाय, किल्ल्याची ३५९ एकर जमीन असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.
किल्ल्यात स्वच्छतेचा अभाव जाणवतो. प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचेच आहे, परंतु आलेल्या पर्यटकांनीही स्वच्छता पाळण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
इतिहासप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी संचालक, सहाय्यक संचालक तसेच संबंधित प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालावे, योग्य ती देखभाल व सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे.