‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा जंगी हल्लाबोल!
धाराशिव,
महाराष्ट्रात महायुती सरकारचे दिवस उरलेसे कमी असून, मंत्र्यांवर लागलेले आरोप मात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बेजबाबदार कारभाराच्या सावटाखाली बसलेल्या अशा ‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात तसेच ‘हतबल’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जंगी आणि हटके आंदोलन करण्यात आले.
आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दयानंद गायकवाड आणि जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारविरोधी संतापाचा ज्वालामुखी फोडला.
माजी कृषिमंत्री आणि आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर ‘जुगार’ खेळण्याच्या प्रतीकातून टोल सोडण्यात आला. आंदोलनस्थळी प्रत्यक्ष रमी पत्त्यांचा डाव लावून त्यांच्या कारभाराची खिल्ली उडवण्यात आली. ड्रग्ज माफियांकडून सत्कार स्वीकारल्याचा आरोप असलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निषेधासाठी ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या हवेत उडवण्यात आल्या. तर ‘जादूटोणा करणारे मंत्री’ म्हणून ओळख मिळालेल्या भरत गोगावले यांच्या नावाने अघोरी पूजा मांडण्यात आली आणि ‘ओम भट स्वाहा’च्या गजरात आंदोलनाची रंगत आणखी वाढवण्यात आली.
कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी काळे रिबीन, मुखवटे, आणि ‘कलंकित’ शब्द असलेले बिल्ले लावून निषेधाची जाणीव करून दिली. महाराष्ट्राला लाज आणणाऱ्या मंत्र्यांना पदावर ठेवणे हा जनतेचा अपमान आहे. भ्रष्टाचार व गुन्हेगारीकडे सरकारची डोळेझाक आता जास्त काळ चालणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला.
या आंदोलनाचा उद्देश मंत्र्यांचे खरे चेहरे जनतेसमोर आणणे, नैतिकतेचा गळा घोटणाऱ्या राजकारणाला आळा घालणे आणि जबाबदार शासनाची गरज अधोरेखित करणे हा असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. जनतेचा संयम आता कमी होत चालला आहे; कलंकित मंत्री आणि हतबल मुख्यमंत्री यांच्या कारभाराला जनता कंटाळली असून हा लढा इथून पुढे अधिक तीव्र होईल, असा इशारा देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.